![]() |
epfo news |
EPFO: लवकरच UPI द्वारे मिळणार पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
नवी दिल्ली: सरकारी आणि खासगी नोकरदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता लवकरच आपल्या सदस्यांना UPI आणि एटीएमद्वारे पेन्शन आणि पीएफचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारशींना मंजुरी दिली असून लवकरच ही नवी सुविधा मे किंवा जून महिन्याच्या अखेरीस लागू होणार आहे.
पेन्शनधारकांसाठी सोयीस्कर बदल
EPFOच्या नव्या बदलामुळे कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन प्रणालीअंतर्गत पेन्शनधारकांना UPI द्वारे थेट त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे दरमहा पेन्शन मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होईल.
तत्काळ लाखोंची रक्कम काढता येणार
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, लवकरच EPFO सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून थेट UPI अॅपद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, पात्र पेन्शनधारक एक लाख रुपये पर्यंतची रक्कम तात्काळ काढू शकतील. तसेच, आपल्या पसंतीच्या बँक खात्यात ही रक्कम हस्तांतरित करण्याची मुभा देखील मिळणार आहे.
डिजिटायझेशनमुळे प्रक्रिया सुलभ
EPFOने आपल्या सर्व प्रक्रियांचे डिजिटायझेशन करण्यात मोठी प्रगती केली आहे. सुमिता डावरा यांनी सांगितले की, पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी १२० डेटाबेस जमा करण्यात आले आहेत. यामुळे, दावे निकाली काढण्यासाठी लागणारा वेळ तीन दिवसांपर्यंत कमी झाला आहे. विशेष म्हणजे, सध्या ९५% दावे स्वयंचलितपणे निकाली काढले जात आहेत आणि भविष्यात ही प्रक्रिया आणखी सोपी करण्याचे नियोजन आहे.
या बदलांमुळे कोणते फायदे होणार?
UPI आणि एटीएमच्या माध्यमातून त्वरित पैसे काढण्याची सुविधापेन्शनधारकांना एका क्लिकमध्ये खाते शिल्लक तपासण्याची सोय
एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा त्वरित विड्रॉल
पीएफवरील नियम अधिक लवचिक होणार
शिक्षण, लग्न आणि वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची सोय करणे होणार सोपे
EPFOच्या या निर्णयामुळे लाखो नोकरदारांना आर्थिक नियोजन करणे सोपे होईल. लवकरच या नव्या सुविधेचा लाभ सर्व सदस्यांना मिळणार असून, नोकरदार आणि पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे.
0 टिप्पण्या