![]() |
CBSE PATTERN IN MAHARASTRA SCHOOL |
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम; शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई, दि. २० मार्च : महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत यासंदर्भात माहिती देत अधिकृत घोषणा केली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीने CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्यास मान्यता दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यभरातील शाळांसाठी नवा अभ्यासक्रम
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. तसेच, या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १ एप्रिल २०२५ पासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांकडून १०० दिवसांच्या कामकाजाचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल
CBSE अभ्यासक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर समान शिक्षणाची संधी मिळणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करताना महाराष्ट्राच्या गरजेनुसार आवश्यक बदल केले जाणार असल्याची माहितीही सरकारने दिली आहे.
शालेय शिक्षणाच्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षण मिळेल आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या