महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान आजपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू

प्रतिनिधी
Mar 10 / 2019

मुंबई, दि. १० : १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. श्री. अश्वनी कुमार यांनी सांगितले की, निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघासाठी एकूण ४ टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या ७ जागांसाठी ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० जागांसाठी १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १४ जागांसाठी २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ ठिकाणी २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघात ३ टप्प्यात मतदान झाले होते.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान आजपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *