सांगली

प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी
Feb 09 / 2019

विटा /प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने प्रा. डॉ. बाळासाहेब निवृत्ती कर्पे यांना सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर येथे झालेल्या राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले व राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांच्या हस्ते पुरस्कार प्रा. कर्पे यांना प्रदान करण्यात आला. राज्य पातळीवर व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व समाजासमोर आदर्श ठरलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्याची योजना शासनाने सुरु केलेली आहे. प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात उल्लेखनीय काम करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. व्यसनमुक्ती या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी कार्यशाळा, व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन, तंबाखू मुक्त परिसर असे उपक्रम घेतले आहेत. अनेक ठिकाणी विशेष मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. पन्नासपेक्षा जास्त लोकांचे समुपदेशन करून त्यांना दारूपासून मुक्त केले आहे. या विषयाच्या अनुषंगाने 500 पेक्षा जास्ती व्याख्यान दिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने व्यसनमुक्ती मोहीम राबवून त्या काळातील सर्व व्याख्याने व कार्यक्रम व्यसनमुक्तीवर घेतले होते. विशेष म्हणजे हे काम करत असताना त्यांनी कोणतेही मानधन न घेता स्व: खर्चाने व निस्वार्थी भावनेने कार्य केले आहे. प्रा. डॉ. कर्पे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील, पी. टी. पाटील, संदेश भंडारे, माजी प्राचार्य डॉ. प्रकाश मोकाशी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, प्रा. डॉ. दत्तात्रय शिंदे, प्रा. डॉ. निवासराव वरेकर, दिगंबर लोंढे, नानासाहेब मंडलिक, वसुंधरा संस्थेचे दत्तात्रय शिंदे, नितीन चंदनशिवे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *