सातारा

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा देशात अव्वल

प्रतिनिधी
Oct 02 / 2018

मुंबई :-- स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण - २०१८ या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सातारा जिल्ह्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील कार्यक्रमात गौरव करणार आहेत. याचबरोबर सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने केंद्रिय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांचा गौरव ही अभिमानास्पद बाब आहे असे श्री.लोणीकर म्हणाले. भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण - २०१८ या अंतर्गत सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरविण्यात आले होते. उद्या पासून सुरू होणा-या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सर्व समाज घटकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही श्री लोणीकर यांनी यावेळी केले. श्री लोणीकर म्हणाले, या सर्वेक्षणाअंतर्गत शौचालय उपलब्धता व वापर,कच-याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जाणीव जागृती, स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारी मुक्तची टक्केवारी आणि पडताळणी, सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजाराची ठिकाणे,मंदिरे - यात्रास्थळे, घनकचरा व्यवस्थापन, गावातील द्रव कचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणीचे सर्वेक्षण करून देशातील जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्हा हा या सर्व बाबींची पुर्तता करत अव्वल ठरला असल्याची माहिती श्री लोणीकर यांनी दिली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लवकरच दुष्काळी भागात इस्त्राईलच्या धर्तीवर वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यात येणार असून, यामध्ये १ हजार ६०० कोटीच्या ७८० योजनांना मंजूरी दिलेली आहे. राज्यातील ३६ लाख लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. यापैकी ५४० योजनांचे कार्यारंभाचे आदेश देण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी ५५१५ कोटी खर्च करण्यात आला असल्याची माहितीही श्री लोणीकर यांनी दिली. तसेच, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनर्जिवन याअंतर्गत २५ कोटीच्या १८ बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनर्जिवित करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आवाहनानंतर सर्व जिल्ह्यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण - २०१८ यामध्ये पुढाकार घेत राज्यास हागणदारी मुक्त करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य ठरले आहे. या अभियानांतर्गत ६० लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. सन २०१६-१७ मध्ये सिंधुदूर्ग , सातारा, कोल्हापूर , सांगली व वर्धा या पाच जिल्ह्यांना स्वच्छता दर्पण हा केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, मागच्या वर्षी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांत महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकाविलेला असल्याची माहितीही श्री लोणीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा देशात अव्वल
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *