कोल्हापूर

कोल्हापूर ते श्री अक्कलकोट पायी दिंडीचे रविवारी प्रस्थान

John Smith
Nov 24 / 2022

कोल्हापूर, दि. 24 (प्रतिनिधी) : मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील ३०० भक्त गेली सात वर्षे अक्कलकोटला पायी चालत जात आहेत. यावर्षी शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रयाग चिखली पंचगंगा नदी संगम, दत्त मंदिर येथे सर्व पदयात्रेकरू जमणार आहेत. दुसर्या दिवशी रविवारी पहाटे पूजाअर्चा, संकल्प करून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पदयात्रेचे अध्यक्ष अमोल कोरे, संस्थापक रमेश चावरे, कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पदयात्रेत महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पदयात्रेतील सर्व भाविकांना अकरा दिवस चहा नाष्टा, महाप्रसाद, राहण्याची सोय मोफत करण्यात आली आहे. अजूनही पदयात्रेला येणार्या भक्तांनी आपली नाव नोंदणी प्रयाग चिखली दत्त मंदिर येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता करून या सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. पदयात्रेचा मार्ग असा आहे. २७ नोव्हेंबर, रविवारी सकाळी पहाटे पाच वाजता दत्त मंदिर पंचगंगा नदी संगम, प्रयाग चिखली-कोल्हापूर येथे सर्व स्वामी भक्तांच्यावतीने स्वामी महाराजांना अभिषेक व संकल्प होऊन पदयात्रा अक्कलकोटकडे प्रस्थान होईल. येथून सकाळी शिवाजी पूल पंचगंगा नदी येथे येऊन कोल्हापूर शहरातून पदयात्रा मिरवणुकीने छ. शिवाजी चौकात पोहचेल. येथे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने महाआरती होईल. तेथून मार्केट यार्ड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारच्या महाप्रसादासाठी थांबेल. रात्री अतिग्रे येथे पदयात्रा मुक्कामी जाईल. दुसर्या दिवशी दि. २८ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात मुक्काम होईल. २९ नोव्हेंबरला - कळंबी प्राथमिक शाळा. ३० नोव्हेंबर - कवठेमहांकाळ. १ डिसेंबर - जुनोनी. २ डिसेंबर - वाढेगाव, ता. सांगोला. ३ डिसेंबर - मंगळवेढा. ४ डिसेंबर - वाघोली सूतगिरणी. ५ डिसेंबर - गेनसिद्धनाथ मंदिर, कुंभारी. ६ डिसेंबर - स्वामी समर्थ सेवा आश्रम कोन्हाळी आणि ७ डिसेंबरला पदयात्रा श्री श्रेत्र अक्कलकोट येथे पोहचेल. अक्कलकोट येथे सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणुकीने समाधी मठ व वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात पदयात्रेचा प्रवेश होईल. सायंकाळी सहा वाजता दत्त जयंती उत्सवानिमित्त सुंठवडा घेतल्यानंतर पदयात्रेचा समारोप होईल. पत्रकार परिषदेला पदयात्रेचे सचिव जगमोहन भुर्के, यशवंत चव्हाण, स्वामी भक्त अनिकेत परीट, राहूल जगताप उपस्थित होते.

कोल्हापूर ते श्री अक्कलकोट पायी दिंडीचे रविवारी प्रस्थान
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *