महत्वाच्या घडामोडी

कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व !

John Smith
Nov 23 / 2022

कोल्हापूरवासियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा हक्काचा कार्यकर्ता, तर चळवळीच्या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीपासून रंकाळा तलाव संवर्धनासाठी झटणारा, दोन वेळेला शहराचे आमदारपद भूषविताना कोल्हापूरच्या विकासाचा प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी, पद असो वा नसो सदैव लोकांच्या सेवेला प्राधान्य देणारे लढाउ बाण्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ! सामाजिक प्रश्न असोत की शहराशी निगडीत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खात्रीचा माणूस इतका विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्याविषयी, ‘कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व’ अशी लोकभावना आहे. राजेश क्षीरसागर यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही संघर्षशील. ना कोणती राजकीय पार्श्वभूमी, ना कुटुंबातील कोणी उच्चपदस्थ. मध्यमवर्गीय कुटुंबांतील या तरुणाने कोल्हापूरच्या राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली. धडाकेबाज कामकाज करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू, जवळचे सहकारी म्हणून राजेश क्षीरसागर हे राज्यभर परिचित आहेत. कार्यकर्ता ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपदापर्यंतची वाटचाल ही जितकी संघर्षमय तितकीच प्रेरणादायी आहे. क्षीरसागर यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात कॉलेज जीवनात झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झाले. शिवसनेकडे आकर्षित झाले. कोल्हापुरात शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय. धडाडीचा कार्यकर्ता म्हणून अल्पावधीतच त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा विश्वास संपादन केला. शिवसेनाप्रमुखांच्या ’८० टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवले. शिवसेनाप्रमुखांच्यावर निष्ठा, अंगभूत धडाडी, संघटन कौशल्य आणि साऱ्यांना सोबत घेत कामकाज करण्याची वृत्ती यामुळे संधी निर्माण होत गेल्या. युवा सेना पदाधिकारी, शहरप्रमुख पदावर काम करताना संघटनात्मक बांधणीसाठी प्रस्थापित राजकारण्याशी संघर्ष केला. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली. टोलमुक्तीचा लढा असो की एलबीटी हटाओ, हद्दवाढीसाठी संघर्ष असो की खंडपीठासाठी आंदोलन, प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरकरांचा आवाज बनतो. दोन वेळेला शहराचे आमदार म्हणून काम करताना सामान्य लोकांच्या हिताच्या कामकाजाला प्राधान्य देतो. पद असो वा नसो सदैव लोकांच्या सेवेला प्राधान्य देणारे लढाउ बाण्याचे आणि शहर विकासाचा ध्यास बाळगून काम करणारे विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे राजेश क्षीरसागर असे समीकरण रुढ झाले. शहरात कोणतीही सार्वजनिक समस्या उद्भवली की लोकांच्या न्याय हक्कासाठी पुढे सरसावण्याची भूमिका साऱ्यांनाच आश्वस्त करणारी आहे. संघटना, प्रशासन आणि सरकार पातळीवर पाठपुरावा करुन काम करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना मोठया शहरात वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना आर्थिक सहाय्य केले. आमदार म्हणून काम करताना त्यांनी शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. थेट पाइपलाइन योजना, शहरातंर्गत रस्ते, गटर योजना, नवीन ड्रेनेज लाइन, अद्ययावत मैदाने, चौक सुशोभिकरण अशा विविध कामांना चालना दिली. दोन वेळेला आमदारकी भूषविताना लोकांच्या हाकेला धावणारा लोकप्रतिनिधी हे नातं आणखी दृढ केले. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांचा पराभव हा धक्कादायक होता. प्रचंड विकासकामे करुनही निवडणुकीत हार पत्करावी लागली. मात्र पराभव झाला म्हणून स्वस्थ बसले नाहीत. विधानसभेच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी लोकांसोबत आंदोलनात उतरले. लढाउ कार्यकर्त्याचा पिंड कायम जपला. त्यांच्या कामाची दखल घेउत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद भूषविले. संवेदनशील वृत्तीने काम करणारा हा लोकप्रतिनिधी. कोरोना आणि महापुराच्या आपत्तीत लोकांना बळ दिले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. वैद्यकीय मदत केली. यामुळे राजेश क्षीरसागर म्हणजे हक्काचा, कामाचा माणूस अशी भावना जनमानसात निर्माण झाली. जून २०२२ मध्ये राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले. भाजपा आणि शिंदे गट एकत्र आला. या राजकीय घडामोडीत क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासातील ते सहकारी आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्येही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. यावरुन त्यांच्यावरील नेतेमंडळींचा विश्वास व्यक्त होतो. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने त्यांनी शहरात कोटयवधी रुपयांचा निधी आणला. रंकाळा तलाव संवर्धनासाठी निधी मंजूर झाला. मैदानासाठी निधी उपलब्ध केला. पायाभूत सुविधांसाठी कोटयवधी रुपयांचे अंदाजपत्रक प्रस्तावाला मान्यता मिळाली. शहर विकासाचा अजेंडा घेउन ते काम करत आहेत. कोल्हापूर शहराची हद्दवाढ, खंडपीठ, रोजगार निर्मिती हे विषय त्यांच्या अजेंडयावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन कोल्हापूरचा विकास घडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व !
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *