कोल्हापूर

रिक्षातून आलेल्या बाळंतिणीची रिक्षातच प्रसूती आणि डॉक्टरांची सतर्कता

MahaNews LIVE
May 12 / 2021

कोल्हापूर: कोव्हिडच्या या भयावह काळामध्ये इतर आजार अथवा व्याधी असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे जिकिरीचे झाले आहे. कोव्हिड निगेटिव्ह दाखला असल्याशिवाय डॉक्टर रुग्णांना तपासत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एका बाळंतिणी बाबत अत्यंत थरारक असा प्रसंग राजारामपुरीतील लोटस हॉस्पिटल मध्ये घडला. मंगळवारी दुपारी एक वाजता अचानक लोटस हॉस्पिटल समोर एकच गलका सुरू झाला. काही नागरिक धावत आले व त्यांनी डॉक्टरांना तातडीने बाहेर या अशी विनंती केली. हॉस्पिटलमधील डॉ. निरंजन शहा धावतच बाहेर आले. रिक्षाचालक व सोबत आलेल्या महिलेने रिक्षामध्ये बाळंतीण महिला असल्याचे डॉक्टरांना सांगितले. रिक्षात डोकावून पाहताच डॉ. निरंजन शहा अवाक झाले. अत्यंत अवघड स्थितीत झोपलेली एक महिला व डोके अर्धवट बाहेर आलेले बाळ पाहून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्या बाळंतीण महिलेला तातडीने दवाखान्यात नेणे गरजेचे होते पण त्याच वेळी बाळाला कोणतीही इजा होऊ नये याची दक्षता घेणेही आवश्यक होते. प्रसूतिवेदनेने विव्हळत असलेली महिला व ते बाळ पाहून डॉ. शहा यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्टाफला प्रसूतीसाठी लागणारी उपकरणे तातडीने बाहेर आणण्यास सांगितले व रिक्षा भोवती अडोसा तयार करुन अत्यंत कौशल्याने रिक्षा मध्येच त्या महिलेची प्रसूती केली. गोखले कॉलेज नासिक महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या सौ. दीपा प्रवीण तुडवेकर यांच्याबाबत घडलेल्या या थरारक घटनेनंतर बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून डॉ. शहा, हॉस्पिटलचा स्टाफ, रिक्षाचालक व बाळंतीणी सोबत आलेल्या महिलेचा जीव भांड्यात पडला. थोडासाही विलंब झाला असता तर बाळंतीण महिला व बाळाच्या जीविताला धोका होता हे लक्षात घेऊन डॉ. निरंजन शहा व बालरोगतज्ञ डॉ. किमया शहा यांनी प्रसंगावधान दाखवून पाऊल उचलले व त्या महिलेच्या व बाळाचा जीव वाचवला. रिक्षा मधेच त्या गोंडस बाळाने जन्म घेतला व त्यानंतर त्या महिलेला व बाळाला हॉस्पिटलमध्ये आत नेऊन त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ यांनी कोव्हीड आपत्तीच्या या काळामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता जोखीम पत्करून त्या महिलेची सुटका केली. मातृत्व कवच योजनेमुळे लोटस हॉस्पिटल हे फॅमिली डिलिव्हरी सेंटर म्हणून पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण राज्यात ओळखले जाते. प्रसूतिपूर्व देखरेख, प्रसूती व आई व बाळाच्या प्रसूतीपश्चात उपचारा पर्यंतच्या सर्व सेवा अत्यंत किफायतशीर शुल्कामध्ये उपलब्ध आहेत. डॉ. निरंजन शहा डॉ. किमया शहा, लोटस हॉस्पिटलच्या स्टाफची कौशल्य व प्रसंगावधान दाखवून बाळंतिणीला घेऊन येणाऱ्या मंगेशकर नगर येथील रिक्षाचालक अस्लम कित्तुरे यांची सतर्कता यामुळे एका बाळंतीण महिलेला व तिच्या बाळाला जीवदान मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोटस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व लोटस फाऊंडेशनद्वारे गेल्या अनेक दशकांपासून सर्वसामान्यांसाठी सेवा देणाऱ्या डॉ. निरंजन शहा व डॉ. किमया शहा यांचे कौतुक होत आहे.

रिक्षातून आलेल्या बाळंतिणीची रिक्षातच प्रसूती आणि डॉक्टरांची सतर्कता
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *