पेज३

मुलगी झाली हो या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शर्वाणी पिल्लई यांच्याशी साधलेला हा खास संवाद

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

स्टार प्रवाहवर २ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शर्वाणी पिल्लई यांच्याशी साधलेला हा खास संवाद ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं वेगळेपण काय सांगाल? मुलगी झाली हो मालिकेचा विषय अतिशय संवेदनशील आहे. जेव्हा मला या मालिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार कळवला. मालिकेतून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या मुलीसाठी आणि आपल्या तत्वांसाठी एक आई कशी उभी ठाकते याची गोष्ट खूप सुंदररित्या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. याआधीही या लाडक्या वाहिनीसोबत बऱ्याच मालिका केल्या आहेत त्यामुळे नव्या मालिकेची प्रचंड उत्सुकता आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील तुमच्या व्यक्तिरेखेविषयी... व्यक्तिरेखेविषयी सांगायचं तर मालिकेत मी आई साकारते आहे. एक अशी आहे जिने विरोध पत्करुन मुलीला जन्म दिला इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली. मी साकारत असलेली आई सोशिक असली तरी त्या सोशिकतेमागे खूप कारणं आहेत. मालिकेच्या भागांमधून ती हळूहळू उलगडत जातील आणि प्रेक्षकांना पटतील अशी आशा आहे. ही मालिका करताना एक अभिनेत्री म्हणून खूप समाधान वाटतंय. सविता मालपेकर, किरण माने या माझ्या सहकलाकारांसोबत काम करताना खूप मजा येतेय. मालिकेत तुमच्यासोबत जी चिमुकली आहे तिच्यासोबतची तुमची केमिस्ट्री कशी आहे? आम्ही सगळे सेटवर तिला माऊच म्हणतो. माऊ अतिशय गोड आहे. पहिल्या भेटीतच तिने आम्हा सर्वांचं मन जिंकून घेतलं. ती अतिशय हुशार आहे. कोणतही गोष्ट ती लगेच आत्मसात करते. मला खूप कौतुक वाटतं माऊचं. माझी आणि माऊची केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडेल. मालिकेच्या प्रोमोजनाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘मुलगी झाली हो’ २ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मुलगी झाली हो मालिकेतून सामाजिक विषयावर भाष्य करण्यात येणार आहे त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर आहे. मुलगी झाली हो या वाक्यात दोन सूर नक्कीच पाहायला मिळतात. कधी तो सूर आनंदाचा असतो तर कधी निराशेचा. वंशाला दिवा हवा, मुलगी म्हणजे परक्याचं धन हे संवाद आपल्या हमखास कानी पडतात. मात्र आपल्या गर्भात नऊ महिने जीव वाढवणारी स्त्री किती श्रेष्ठ आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जगन्माता देवीची आपण उपासना करतो मग तिचाच अंश असणाऱ्या तिच्या जन्माचाही खुल्या दिलाने स्वीकार करायला हवा असंच मला वाटतं. मालिकेतून नेमका हाच विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.

मुलगी झाली हो या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शर्वाणी पिल्लई यांच्याशी साधलेला हा खास संवाद
Categories : पेज३ Tags : पेज३
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *