महत्वाच्या घडामोडी

मतदानादिवशी भरपगारी सुट्टी दिली नाही तर मालकाविरुद्ध तक्रार करू शकता.

MahaNews LIVE
Oct 19 / 2019

महान्यूज लाईव्ह : महाराष्ट्रात २१ ऑक्‍टोबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं. नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, मतदानाचा हक्क बजावावा आदींसाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम, योजना राबवण्यात येत आहेत. यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे निवडणूकीच्या दिवशी सर्व दुकाने, आस्थापने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे आदी ठिकाणच्या कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान मतदानाच्या दिवशी कामगारांना देण्यात येणारी सुट्टी भरपगारी असणार आहे. दंडाची कारवाई कामगारांना सुट्टी न देणाऱ्या कार्यालयांवर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. शासनाने त्यासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले होते. जर कुठल्याही कंपनीला एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्‍यक राहील. पण जर मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नसेल, किंवा भरपगारी दोन ते तीन तासांची सवलत मिळत नसेल तर मतदारांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येणार आहे.ही तक्रार प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे, मुंबई येथे तक्रार नोंदविता येईल असे कामगार आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

मतदानादिवशी भरपगारी सुट्टी दिली नाही तर मालकाविरुद्ध तक्रार करू शकता.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *