कोल्हापूर

शिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार ?

MahaNews LIVE
Sep 19 / 2019

Enter कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नावांचीच फक्‍त चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात कोण लढणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र, मधुरिमाराजे छत्रपती, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अ. भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम या नावांची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना युती फिस्कटली, तर कुंपणावर बसलेल्या इच्छुकांची आणखी नावे बाहेर येणार आहेत. तूर्तास तरी कोल्हापूर उत्तरची लढत दुरंगी, तिरंगी की बहुरंगी होणार, अशा चर्चा फक्‍त सुरू आहेत. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्‍ला मानला जातो. अपवाद वगळता या मतदारसंघावर भगवा फडकला आहे. सध्याचे आ. राजेश क्षीरसागर हे शिवसेनेतून सलग दोनवेळा आमदार झाले आहेत. तत्पूर्वी, काँग्रेसकडून 2004 साली मालोजीराजे हे निवडून आले होते. 2004 पूर्वी सलग दोनवेळा सुरेश साळोखे यांनी प्रतिनिधित्व केले होते. आ. क्षीरसागर यांच्यासमोर यंदा & शिवसेनांतर्गत गटबाजीचे आव्हान त्रासदायक ठरेल, असे दिसते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी शिवसेनेतून उमेदवारी मागितली आहे. आ. क्षीरसागर व पवार या दोन गटांत पूर्वीपासून फारसे सख्य नाही. यासह शिवसेनांतर्गत शहरात गटबाजी वारंवार उफाळून येताना दिसते. याउलट आ. क्षीरसागर यांचा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. दोन टर्म आमदारकी असल्याने त्यांना काही घटकांच्या नाराजीलाही तोंड द्यावे लागणार आहे. आ. क्षीरसागर यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. दुसर्‍या बाजूला मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून फक्‍त काही नावेच पुढे येताना दिसतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे ‘उत्तर’चे ‘उत्तर’ असेल, अशी चर्चा असताना ते ‘दक्षिण’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप-शिवसेनेची युती होईल, असे मानून आ. क्षीरसागर बिनधास्त दिसत असले, तरी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी ‘कोल्हापूर उत्तर’वर भाजपचा दावा सांगितला आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 40,104 मते घेतली होती. त्यामुळे भाजप व शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. युती झाली तरी अपक्ष म्हणून एखादे बडे नाव पुढे आले, तर आश्‍चर्य वाटणार नाही. युती फिस्कटली तर मात्र भाजपकडून जाधव यांच्यासह मधुरिमाराजे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. सध्या मधुरिमाराजे यांचा निर्णय जाहीर झालेला नाही. परंतु, त्या रिंगणात उतरल्या, तर काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप किंवा अपक्ष हासुद्धा त्यांचा पर्याय असू शकतो. गत 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सत्यजित कदम यांनी 47,315 मते घेतली होती. त्यावेळी आ. क्षीरसागर यांना 69,736 मते पडली होती. कदम यांची ताराराणी आघाडी लवकरच भाजपवासी होणार असल्याने तेसुद्धा उत्तरमध्ये प्रबळ दावेदार होऊ शकतात. त्यांनी गत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मते घेतली होती. कदम हे महाडिक गटाचे नातेवाईक असल्याने हा संपूर्ण गट त्यांच्या पाठीशी राहणार, हे उघड आहे. एकूण निवडणुका उंबरठ्यावर आल्या असतानाही उत्तरमधून कोण रिंगणात असेल याचे उत्तर अद्याप ठोस मिळत नाही.

शिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार ?
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *