मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे - महसूल मंत्री
MahaNews LIVE
मुंबई, दि. 19 : राज्य शासनाने मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे त्यांना उद्योगासाठी सुलभपणे कर्ज मिळावे, यासाठी बँकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण संदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. या योजनेसंदर्भातील बँकांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून कर्ज पुरवठा सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरुणांसाठी सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध बँकांचे अधिकारी, बँकर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बँकांच्या प्रतिनिधींना या योजनेसंदर्भात माहिती देऊन त्यांच्या प्रश्नांना श्री. पाटील यांनी उत्तरे दिली. या बैठकीला कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. सेंट्रल बँकेच मुख्य प्रबंधक सुनिल हुमणे, आंध्र बँकेचे महाव्यवस्थापक अनिल सिंह, बँक ऑफ महाराष्ट्रचे विक्रांत पाटील, इंडस् इंड बँकेचे सुरजकुमार प्रमाणी, कँनरा बँकेचे संजय देवळे, अग्रणी बँकचे व्यवस्थापक संजीव साप्ते यांच्यासह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, ओरिएटंल बँक ऑफ कॉमर्स, ॲक्सिस बँक, यस बँक, सारस्वत बँक, युको बँक, राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, विदर्भ कोकण बँक आदी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Comments
- Leave your comment