पाच जणांची हत्या करणारा आरोपी वैष्णोदेवीत.....
MahaNews LIVE
नागपूर : पाच जणांची हत्या करून पसार झालेला विवेक पालटकर हा प्राध्यापक असल्याचे सांगून भाड्याने राहात होता, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. आराधनानगर येथील हत्याकांडप्ररकणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.घटनेच्या २० दिवसांआधी विवेक हा रमेश गिरीपुंजे यांना भेटला. माझे नाव सुरेश जिभकाटे आहे. मी प्राध्यापक आहे, असे त्याने गिरीपुंजे यांना सांगितले. भाड्याने खोली हवी असल्याचेही विवेक त्यांना म्हणाला. गिरीपुंजे यांनी त्याला रिंगरोडवरील चामट लॉन येथील खोली भाड्याने दिली. गुरुवारी विवेक राहत असलेल्या घराचा छडा पोलिसांना लागला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता तेथे जादूटोण्याचे साहित्य पोलिसांना आढळून आले होते. दरम्यान, रक्तपात केल्यानंतर तो वैष्णोदेवीला जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाल्याची माहिती आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी विवेकच्या संपर्कात असलेल्या गुन्हेगारांसह शंभराहून अधिक जणांची चौकशी केली. तो संपर्कात असलेले जडीबुडी विक्रेते चितोडिया व अमरेश या दोघांचीही चौकशी करण्यात आली. हत्याकांडाच्या दोन दिवसांपूर्वी विवेकने मोबाइलवर संपर्क साधून संधीवाताच्या औषधीबाबत विचारणा केली होती, असे दोघांनी पोलिसांना सांगितले. पोलिस विवेकचा कसून शोध घेत आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.पवनकर कुटुंबातील चार सदस्यांसह पाच जणांची हत्या करून पसार झालेला विवेक हा शहरात लागलेल्या एकाही सी.सी.टी.व्ही .फुटेजमध्ये दिसला नसल्याची माहिती समोर आली आहे. हत्याकांडानंतर तब्बल चार तास तो नागपुरात होता. दिघोरीतून तो उमरेडकडे गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भागात अनेक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. असतानाही एकाही सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये तो दिसत नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Comments
- Leave your comment