थोडक्यात महत्वाचे

बाजार समिती संचालकांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

John Smith
Jun 13 / 2018

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत विविध मार्गांनी 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्व संचालकांना बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी दिले. विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वय 47, रा. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सभापती दिलीप माने यांच्यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँकेस फायदेशीर होईल अशापध्दतीने बाजार समितीच्या ठेवी ठेवणे, बांधकाम ठेकेदाराकडून दंडाची आकारणी न करता मुदतवाढ देणे, नियमबाह्य भरती करणे, नियमबाह्य जाहिराती देणे, बाजार शुल्क व देखरेख फी विलंबाने जमा करणार्‍यांकडून दंड व्याज न आकारणे, गाळ्यांचे लिलाव न करता वाटप करणे अशा वेगवेगळ्या 14 मुद्द्यांवर बाजार समितीचा विश्‍वासघात करुन बाजार समितीच्या संचालक मंडळाने 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्टोबर 2016 याकालावधीत 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचे नुकसान केले म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात विशेष लेखापरिक्षक काकडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असून गुन्हा दाखल झालेल्या संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी होऊन 17 संचालकांना न्यायाधीश मोराळे यांनी 11 जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. 11 जून रोजी अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केलेल्या सर्वच संचालकांच्या अर्जांवर दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद पूर्ण झाला. मंगळवारी याप्रकरणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश हेजीब यांच्यासमोर पुन्हा सुनावणी झाली. दरम्यान, सरकार पक्षाने न्यायालयात अर्ज दाखल करून चौकशीच्यावेळी सर्व अर्जदारांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश द्यावा, तसे न झाल्यास सर्व अर्जदार हे पळून जाण्याची शक्यता असल्याचा युक्‍तिवाद करण्यात आला. तो मान्य करीत न्यायाधीश हेजीब यांनी सर्व अर्जदारांना बुधवार, 13 जून रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ज्या अर्जदारांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता त्या सर्व अर्जदारांना न्यायालयात हजर राहणे बंधनकारक आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांचा जामीनाचा अर्ज सरळमार्गी नामंजूर होऊ शकतो आणि हजर राहिले आणि अटकपूर्व जामीनअर्ज नामंजूर झाल्यास त्यांना लगेच अटकदेखील केली जाऊ शकते. त्यामुळे आज काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. प्रदीपसिंग रजपूत यांनी, तर संचालकांच्यावतीने अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. भारत कट्टे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, अ‍ॅड. गुरुदत्त बोरगावकर काम पाहात आहेत.

बाजार समिती संचालकांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *